रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासाठी अन्न औषध प्रशासनाचा मोठा निर्णय
राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी रेमडेसिवीर लस, वैद्यकीय साहाय्य ऑक्सिजन व रक्ताची मुबलक उपलब्धता करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मोठी पावले उचलली आहे. सध्या महाराष्ट्रात कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून, संभाव्य वाढणा-या रुग्णांचे हित लक्षात घेऊन ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनची व रक्ताची पुरेशी उपलब्धता व्हावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत.
औषध नियंत्रण, भारत सरकार यांनी संबंधित औषधांच्या उत्पादन व विक्री/वितरणासाठी मे.सिप्ला लि., मे. हेटेरो हेल्थकेअर व मे. मायलॅान लि., मे. झायडस कॅडिला, मे. डाँ. रेडिज, मे. ज्यूबीलंट लाईफ सायंसेस व मे. सन फार्मा. या औषध उत्पादकांना उत्पादन व विक्री/वितरणासाठी अनुमती दिलेली असून, सध्या एकूण 7 औषधी उत्पादकांचा रेमडेसिवीरचा साठा अत्यवस्थ रुग्णांसाठी उपलब्ध आहे.
या औषधांची विक्री वितरण हे त्यांच्या भिवंडी, नागपूर व पुणे इत्यादी डेपोमधून संपूर्ण राज्यात शासकीय आणि निमशासकीय रुग्णालये, संस्था व वितरकांना पुरवठा होत आहे. आरोग्य व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांचे व मेडिकल ऑक्सिजन उत्पादक यांचे प्रतिनीधी व प्रशासनाचे अधिकारी यांचे सोबत तातडीची बैठक घेतली. तसेच महाराष्ट्र राज्यासाठी जास्तीत जास्त इंजेक्शनचा पुरवठा व मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता यांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच त्यानुसार सर्व उत्पादकांनी प्राधान्याने महाराष्ट्र राज्यासाठी औषधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेले असून, सध्या देखील सुमारे ५० हजार ते ते साठ हजार इंजेक्शनचा साठा दररोज उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही, असे शिंगणे यांनी सांगितले.