Fake Vaccination | नवी मुंबईत बोगस लसीकरण; 350 कामगारांना दिली बनावट लस
सिद्धेश म्हात्रे | राज्यात एकीकडे लसीकरणाला वेग दिला जात असतानाच दुसरीकडे बोगस लसीकरणाच्या प्रकरणातही वाढ होताना दिसते आहे. आता एकामागोमाग एक बोगस लसीकरणाची प्रकरणे उघड होत आहे. नवी मुंबईत आता बोगस लसीकरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
नवी मुंबईत देखील एक बनावट लसीकरण प्रकरण समोर आले आहे. शिरवणे एमआयडीसी मधील ऍटमबर्ग टेक्नॉलॉजी या कंपनीतील एक नव्हे तर चक्क 350 कामगारांचे बनावट लसीकरण झाल्याची धक्कादायक माहिती दिली आहे.
23 एप्रिल रोजी कंपनीने कामगारांसाठी लसीकरण मोहीम राबविली होती ज्याची जबाबदारी के.ई.सी.पी हेल्थ केयर हॉस्पिटलवर सोपविण्यात आली होती. यामध्ये 350 कामगारांचे लसीकरण करण्यात आले ज्याचे 4 लाख 24 हजार रुपये देखील उकळण्यात आले होते.
दरम्यान जेव्हा कंपनीतील काही कामगार लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना देण्यात आलेली लस बोगस असल्याची बाब उघड झाली आहे.
आता कंपनीतर्फे सदर प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असता तात्काळ तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात डॉ मनीष त्रिपाठी, करीम व अन्य साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या बोगस लसीकरण प्रकरणाचा नवी मुंबई पोलीस कसून तपास करीत आहेत.