कृषी उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करा; रवी राणा यांची बाबा रामदेव यांच्याकडे मागणी
सुरज दाहाट | अमरावती : अमरावती येथील नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये पतंजलीच्या माध्यमातून संत्रा, डाळिंब, केळी, आवळा, सीताफळ, सोयाबीन, मका, मुंग इत्यादी कृषी उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची विनंती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी योगगुरू बाबा रामदेव यांना केली.लवकरच अमरावतीत उद्योगासाठी जागा पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासन यावेळी बाबा रामदेव यांनी आमदार रवी राणा यांना दिल्याची माहिती आहे.
मेळघाटातील आदिवासींना आपल्या हक्काचा रोजगार मिळावा यासाठी मोह मोहफुल या औषधयुक्त नैसर्गिक फळांचा वापर करून त्यापासून आयुर्वेदिक औषधी निर्माण केल्यास धारणी-चिखलदरासह मेळघाटातील आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल व आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही अशी भूमिका यावेळी आमदार राणा यांनी बाबा रामदेव यांच्यापुढे मांडली.
पतंजली समूहातर्फे अमरावती येथे फळे व कृषी उत्पादने प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील इतर शेतकऱयांना त्याचा लाभ होईल,त्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळेल,शेतकरयांना हक्काची बाजारपेठ मिळेल व विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होईल असे आमदार रवी राणा यांनी बाबा रामदेव यांच्या निदर्शनास आणून दिले.या उद्योगामुळे अमरावती जिल्ह्यातील बेरोजगार तरुण तरुणींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल व हजारो स्थानिकांना काम मिळेल त्यामुळे पतंजलीने नांदगाव पेठ पंचतारांकित एम आय डी सी मध्ये मोठा कृषि उत्पादन प्रक्रिया प्रकल्प सुरू करावा अशी आग्रही मागणी आमदार रवी राणा यांनी बाबा रामदेव यांना केली.