ATM मधून 500 काढताच निघू लागले 2500, आता वसुली होणार
कल्पना नळसकर|नागपूर
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा गावात एका एटीएममधून (ATM)500 रुपये विड्रॉल टाकल्यावर एटीएम मशीन मधून 2 हजार 500 रुपये विड्रॉल होत असल्यामुळे मंगळवार च्या पहाटे परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती.
नागपूर जिल्ह्यातल्या खापरखेडा गावातील एटीएममध्ये अक्षरशः चमत्कार झाला. पैसे काढण्यासाठी पाचशे रुपयांचा आकडा टाकला की, ते पैसे निघायचेच. सोबतच त्यानंतर जास्तीचे अडीच हजार रुपये बाहेर यायचे. त्यामुळे या एटीएमवर पैसे काढण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली.
खापरखेडा गावातील शिवा कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये ही किमया घडत होती. अनेक तरुणांनी या पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल टाकून एटीएममशीनमधून अडीच हजार रुपये मिळविले. ही बातमी सगळीकडे पसरली. याचा फायदा अनेकांनी घेत पैसे काढले. विशेष म्हणजे या एटीएमवर पैसे काढल्यानंतर बँकेतून मोबाइलवर कोणताही मेसेज संबंधितांना आला नाही. जेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस एक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरवर पोहोचले आणि त्यांनी शटर डाऊन करत एटीएम सेंटर बंद केले. पोलिसांनी बँकेच्या अधिकार्यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी आज तिथे पोहोचून एटीएम मशीनची तपासणी केली.
दरम्यान किती नागरिकांनी अशाच पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल टाकून अडीच हजार रुपये नेले आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही.
रात्रीपर्यंत गर्दी
खापरखेड्यातील एटीएमवरून अनेकांनी पैसे काढले. त्यानंतर या एटीएमची चर्चा सर्वदूर पसरली. पहाटे तीन वाजता नागपूर, कोराडी आणि खापरखेडा परिसरातील युवकांनी एटीएमकडे पैसे काढण्यासाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला.
बँकेचे स्पष्टकरण
पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन एटीएमची तपासणी केली. दरम्यान किती नागरिकांनी अशाच पद्धतीने पाचशे रुपयांचे विड्रॉल टाकून अडीच हजार रुपये नेले आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, पैसे काढणाऱ्या एटीएमधारकांचा डाटा काढून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.