लाच घेताना भिवंडी पालिकेच्या कर्मचाऱ्यास रंगेहात पकडले

लाच घेताना भिवंडी पालिकेच्या कर्मचाऱ्यास रंगेहात पकडले

Published by :
Published on

भिवंडी पालिकेतील मयत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित रक्कम मिळवून देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच घेताना पालिका भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील प्रभारी कर्मचाऱ्यास पालिका कार्यालयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. या घटने नंतर पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.

पालिका सेवेतील कर्मचारी सिद्धार्थ मारुती घाडगे हे 29 मे 2021 रोजी मयत झाल्याने त्यांच्या पत्नी अस्मिता यांनी भिवंडी पालिका भविष्य निर्वाह निधी कार्यालयात अर्ज करून मयत कर्मचाऱ्यांच्या नावे जमा असलेली ग्रॅज्युईटी, भविष्य निर्वाह निधी, गट विमा व रजेचा पगार ही रक्कम मिळण्याबाबत अर्ज केला होता. पालिका जुन्या मुख्यालय इमारती मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या भविष्य निर्वाह निधी विभागातील प्रभारी कर्मचारी आनंद जगताप याने मयत कर्मचाऱ्याचा भाऊ राहुल घाडगे यांच्याकडे धनादेश काढून देणेसाठी 5 हजार रुपयांची मागणी केली असता, तडजोडी अंती 4 हजार देण्याचे मान्य केले. याबाबत राहुल घाडगे यांनी ठाणे येथील लाचलुचपत विभागात तक्रार केली. त्यांनी सापळा रचून चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना आनंद जगताप यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी जबाब नोंदविला जाणार, त्यानंतर गुन्हां नोंदविला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com