शेतकऱ्यांच्या जमिनी सरकार भाड्यांवरती घेणार आणि...; एकनाथ शिंदेंची महत्वपूर्ण माहिती
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली आहे. राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. तर शेतकऱ्यांच्या जमिनी या भाड्यांवरती घेऊन त्याठिकाणी सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणार, असेही त्यांनी म्हंटले आहे.
शेतकऱ्यांसंदर्भात आज महत्त्वाचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला शेतकऱ्यांच्या जमिनी या भाड्यांवरती घेऊन त्या ठिकाणी सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केल्यास विजेची बचत देखील होईल आणि शेतकऱ्यांना दिवस रात्र वीज उपलब्ध होईल या संदर्भातला हा निर्णय आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
तर, शेतकऱ्यांच्या जमिनी ३० वर्षे भाड्यावर ५० हजार रुपये एकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी यात ३ टक्के वाढ केली जाईल. फिडरच्या ५ किलोमीटर च्या क्षेत्रातील खाजगी व सरकारी जमीन सरकार घेणार आहे.
सौरऊर्जेसाठी आमच्याकडे गुंतवणूकदार तयार आहेत. सौरऊर्जा ३ रुपये ते ३.३० रुपयांना पडणार आहे. त्यामुळे सबसिडीत घट होईल. पर्यावरणात कोळसा वापरामुळे होणारी हानी टाळता येईल. देशात असा निर्णय घेणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरेल. राळेगणसिद्धी येथे मी मुख्यमंत्री असताना सौरफीडर तयार केले होते. ४ वर्षांपासून ते सुरु असून याप्रमाणे ८ हजार सौर पंप सुरु केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान, दिव्यांगांना देखील दिलासा देणारा निर्णय हा सरकार कडून घेण्यात आलेला आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्यातर्फे देखील पदोन्नतीत त्यांना आरक्षण हे चार टक्के दिले जाणार आहे. त्यामुळे दिव्यांग यांचा संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय हा सरकारकडून घेण्यात आलेला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.