एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Eknath Shinde will be new CM of Maharashtra : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार स्थापन होईल हे निश्चित आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळीच 7 वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील." एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.