शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांच्या घरी ईडीचा छापा, वैद्यकीय उपचारासाठी अडसूळ रुग्णालयात
शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं आहे. सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजप आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. ईडीचे अधिकारी अडसूळ यांच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्याआधीच आनंदराव अडसूळ यांच्या वैद्यकीय तपासणासाठी डॉक्टर अडसूळ यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर आता त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.