हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; 3.6 रिश्टर स्केलची नोंद
गजानन वाणी | हिंगोली : जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी या तीन तालुक्यातील गावात आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाच्या धक्क्यांच्या घटनेमुळं जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्ह्यात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिली आहे. या भूकंपात कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
हिंगोलीच्या वसमत, कळमनुरी आणि औंढा तालुक्यांमध्ये यापूर्वीही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. पुन्हा आज सकाळी 4 वाजून 30 मिनिटाला 3.6 रिश्टर स्केल असा भूकंपाचा धक्का बसलेला आहे. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली. परंतु, या प्रकारानंतर वसमत, कळमनुरी, औंढा या तिन्ही तालुक्यातील 17 ते 18 गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. औंढा तालुक्यातील दुधाळा, जलालधाबा, राजापूर या गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात कोणतेही नुकसान झाले नसून प्रशासनाकडून घाबरून न जाण्याचं आव्हान करण्यात आलं आहे.