रस्त्याअभावी झोळीतुन नेता नेता रुग्णाने सोडले प्राण
मयुरेश जाधव (मुरबाड) | मुरबाड तालुक्यात रस्त्याअभावी आजारी रुग्णाला झोळीतुन नेता नेता रुग्ण दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. नवसु धाकु सराई असे त्या मृत्यु झालेल्या आदिवासीचे नाव आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने नवसु यांचा वाटेतच मृत्यू झाला.
देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पुर्ण झाले आहेत. मात्र आजही असंख्य घटक सोयी सुवीधांपासून वंचित आहे. मुरबाड तालुक्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. मुरबाड तालुक्यातील साखरे सराईवाडीतील . नवसु आजारी असल्याने त्यांना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झोळी करून रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे गावात रस्ता नसल्याने हा मृत्यू झाला आहे.
गावात वाहन येण्यासाठी रस्ता नसल्याने आजारी रुग्णांला चादरीची झोळी करुन रुग्णालयात नेले जाते. अशात वेळेत रूग्ण रुग्णालयात पोहोचल्यास तो बचावतो अथवा तो दगावतो. अश्या प्रकारे वेळीच उपचार न मिळाल्याने गेल्या काही दिवसांत या आदिवासी पाड्यातील तीन जणाचा मृत्यू झाला आहे. या गावात ३२ आदिवासी कुटुंब राहत असुन त्यांना वर्षोनुवर्षे रस्ता,पाणी या समस्या भेडसावत असून सरकार अजूनही त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे.