डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी याबाबत माहिती दिली. १३ ऑगस्ट रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. दीपक टिळक म्हणाले की, पूनावाला समूहाच्या सीरम इन्स्टिट्यूटने कोविशील्ड लसीने जगभरातील कोट्यवधी नागरिकांना कोरोना महामारीपासून सुरक्षित ठेवले आहे. तसेच विविध प्रकारच्या लस निर्मितीमधील जागतिक स्तरावरील कंपनी आहे. त्या पार्श्वभूमीवर टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.
१३ ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे तर माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरुप असणार असल्याचे त्यांनी सांगितले.