मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? शिंदेंच्या नाराजीमुळे बदल्या अडकल्या
राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु असताना अशातच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद असल्याचे समोर येत आहे. आमदारांनी सुचवलेले नावे आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या यादीत तफावत असल्यामुळे वाद सुरु झाला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका व्यासपीठावर सुद्धा दिसत नाहीय, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या वरून एकमत झाले नसल्याने महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्याचे समजते. निवडणूक प्रचार, शहरातील, तसेच जिल्ह्यातील महत्त्वाचे निर्णय पोलिसांच्या हातात असल्याने आपल्या मर्जीतील अधिकारी नेमण्यावरुन शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये नाराजी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिले आहे.
शनिवारी रात्री महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन शिंदे-फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत बदल्यांवरून बिनसल्यानंतर रविवारी या दोन्ही नेत्यांचे तीन कार्यक्रम होते. या कार्यक्रमांना दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसणार होते. मात्र ते एकाही ठिकाणी एकत्र न आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्यानंतर पोलीस दलाचा क्रमांक लागतो. राज्यातील विविध शहरांमधील पोलीस आयुक्त आणि जिल्ह्यामधील पोलीस अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांना अधिक महत्व आहे. या अधिकाऱ्यांचा फायदा राजकीय मंडीळीना सुद्धा चांगला होतो त्यामुळे पोलिसांच्या बदल्यांमध्ये राजकारण्यांचे बरेच स्वारस्य असते.