Deepali Chavan Suicide : “दीपाली चव्हाण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा”
हरीसाल या दुर्गम भागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. यानंतर दोन अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आली. तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर मुख्य वनरंक्षक एम.एस. रेड्डी यांचेही तत्काळ निलंबन झाले. या प्रकरणानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे.
तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट घालण्यात आला. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन केल्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले.