शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटींची मागणी
पुणे : कॅबिनेट मंत्रीपद देण्याच्या नावाखाली तीन आमदारांकडे शंभर कोटी रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. रियाज अलबक्ष शेख (रा. कोल्हापूर), योगेश मधुकर कुलकर्णी (रा.पाचपाखाडी, ठाणे), सागर विकास संघवी (रा.पोखरण ठाणे) आणि जाफर (रा.अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक आमदार मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. या संधीचा फायदा घेत आरोपीने आमदारांना फोन करत मंत्रीपदाचे आमिष दाखवले. आरोपींनी दिल्लीवरून आल्याची बतावणी आमदारांना केली. आणि दिल्लीतील एक मोठा नेता त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला. मंत्रिपदासाठी इच्छुक असल्यास 100 कोटी द्यावे लागतील. त्यानंतर १७ जुलैला आरोपीने ऑबेरॉय हॉटेलमध्ये आमदाराची भेट घेतली. व अमित शहा यांच्यासोबत मिटिंग लावून देण्याचे खोटे आश्वासन दिले. व मंत्रिमंडळात सहभागासाठी ९० कोटी रुपये मागत असून त्यातील १८ कोटी रुपये उद्या द्यावे लागतील, असे सांगितले.
याप्रकरणाची तक्रार आमदाराच्या स्विय सहाय्यकाने पोलिसांना दिली. यानुसार पोलिसांनी ऑबेरॉय हॉटेलमध्ये सापळा रचला. व पैसे घेण्यासाठी आरोपी ऑबेरॉय हॉटेलमध्ये येताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून रियाझ शेख हा मुख्य सूत्रधार होता. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. यामधून मंत्रीपद देण्याच्या नावाखाली मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.