Cyclone Gulab | गुलाब चक्रीवादळ ‘या’ किनारपट्टीवर धडकणार, रेड अलर्ट जारी
बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. परिणामी आज, रविवारी संध्याकाळपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ९५ किमी तासी वेगाने किनारपट्टीकडे सरकत असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या दोन राज्यातील किनारपट्टी क्षेत्रावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारी २७ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे ओडिशाच्या आणि आंध्रच्या काही भागात मुसळधार पाऊस पडणार असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत होणार असल्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे काही प्रमाणात पूराची शक्यता असल्याचे तसेच इतर प्रकराच्या नुकसानीचाही इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
या चक्रीवादळाचे 'गुलाब' नाव हे पाकिस्तानने सुचवलं आहे. विशाखापट्टनम आणि गोपालपूर या दरम्यान असलेल्या कलिंगपट्टनम या ठिकाणी संध्याकाळपर्यंत गुलाब चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात मच्छिमारांना आज न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरात तौक्ते आणि यास या चक्रीवादळानंतर या वर्षी निर्माण होणारं गुलाब हे तिसरं चक्रीवादळ आहे.