मेळघाटात अंधश्रद्धेचा बळी… कोरोनाबाधित महिलेला उपचारांसाठी नेलं मांत्रिकाकडे!
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना अमरावतीतील मेळघाटात अंधश्रद्धेमुळे एका महिलेचा बळी गेला आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिलेला मांत्रिकाकडे नेण्यात आले. दरम्यान गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला.
मेळघाटातील सेमाडोह गावात ही घटना घडली. कोरोना असल्याने प्रशासनाने रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र नातेवाईकांनी नकार दिला. अखेर शुक्रवारी दुपारी 2 वाजता महिलेवर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले.
डॉक्टरांनी दिला होता गृह विलगीकरणाचा सल्ला
सेमाडोह येथील एक ४५ वर्षीय विधवा महिलेची प्राथमिक आरोग्य केंद्र, सेमाडोह येथे रॅपिड अँटिजन तपासणी करण्यात आली. ही महिला बाधित असल्याचा अहवाल 12 एप्रिलला आला. त्यानंतर महिलेला गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र हा कोरोना नसून अन्य आजार असल्याचे महिलेने आरोग्य यंत्रणेला सुनावले. यानंतर महिलेने उपचारासाठी सेमाडोहपासून दहा किमी अंतरावरील भवई गाव गाठले. तेथे नातेवाईकांकडे जाऊन मांत्रिकाकडे उपचार सुरू केले. या दरम्यान आजार वाढल्याने शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.