महाराष्ट्र दिनी मोठा नक्षलवादी हल्ला करण्याचा कट; पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना केले ठार
कल्पना नलस्कर | नागपूर : महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला घडविण्याचा कट असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यासंबंधी पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा, नक्षल साहित्य जप्त करण्यात आला आहे.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलतपल यांनी सांगितले की, काल संध्याकाळी एक गुप्त माहिती मिळाली की नक्षलवादी जंगलात तळ ठोकून आहेत आणि 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मोठा हल्ला घडवून आणण्यासाठी तिथे घात घालून बसले आहेत. या माहितीनंतर सी-60 कमांडोंची एक तुकडी रवाना करण्यात आली. दरम्यान, या कारवाईत नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन नक्षलवाद्यांना ठार केले आहे. त्यांच्याकडून दारूगोळा, शस्त्रे आणि नक्षल साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षली हल्ला करण्यात आला होता. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी) च्या जवानांवर हल्ला होता. हे जवान गस्तीवर पायी निघाले होते मात्र परतताना थकवा आल्याने त्यांनी पिकअप वाहनात लिफ्ट घेतली. त्याचवेळी नक्षलींनी जवानांच्या वाहानांवर आयईडीनं निशाणा साधला. यामध्ये 11 जवान शहीद झाले होते.