बाप्पा पावला! LPG सिलिंडर थेट 100 रुपयांनी स्वस्त
मुंबई : वाढत्या महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात सुमारे १०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच १ सप्टेंबरपासून ही कपात लागू होणार आहे. मात्र, घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नव्या दरांनुसार व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर दिल्लीत 19 किलोचे 91.50 रुपये कमी झाले. तर, मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचे दर 92.50 रुपयांनी कमी झाल्यानंतर सिलिंडर 1844 रुपयांना मिळत आहे. कोलकात्यात सिलिंडर 1995 रुपये दर असेल.
परंतु, घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर 6 जुलैपासून जैसे थे आहेत. मुंबईत घरगुती सिलिंडर 1,052 रुपयांना मिळत आहे. याशिवाय घरगुती सिलिंडरचे दर दिल्लीत 1,053 रुपये, कोलकात्यात 1,079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,068 रुपये आहे.
दरम्यान, ऑगस्टमध्येही कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतींमध्ये कपात केली होती. ऑगस्टमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 36 रुपयांची कपात करण्यात आली होती. देशभरात ही कपात करण्यात आली होती.