राज्याच्या काही भागांत थंडीची चाहूल; 'या' भागात पावसाची शक्यता
राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्रासह राज्यात इतर भागात गारवा वाढला आहे. सध्या राज्यभरात कोरडे वातावरण आहे. पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानात घट होण्याचा कल कायम राहील. सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील तापमान कमालीचं घसरलं आहे. मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टीसह गोव्यात गारठा वाढला आहे. छत्तीसगड, तेलंगणा, रायलसीमा, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि यानाम आणि अरुणाचल प्रदेशात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे.
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवेल. राज्यात 23 नोव्हेंबरपासून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढेल. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल. दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. राज्यात रविवारी सर्वांत कमी 14 अंश सेल्सिअस तापमान जळगावात नोंदवले गेले, तर रत्नागिरीत सर्वाधिक 35.6 अंश सेल्सिअस तापमान होते.