यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा दुसरा मोठा निर्णय
मागील दोन वर्षापासून गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे (Coronavirus) निर्बंध असल्याने राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्यात आला आहे. मात्र यावर्षी कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही निर्बंध असणार नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनाही सूचना देण्यात आले आहे. कोरोनामुळं अनेक निर्बंध होते पण यंदा सर्व मंडळांची इच्छा लक्षात घेऊन दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम हे राज्यातील उत्सव साजरे झाले पाहिजे, अशी बैठकीत चर्चा झाली. कायदा-सुव्यवस्था राखून हे उत्सव साजरे झाले पाहिजेत अशा सूचना पोलीस, जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.