प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ असणार; मुनगंटीवारांनी दिली माहिती
नागपूर : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश होणार आहे. अनेक दिवसांपासून दिल्लीतील परेडमध्ये चित्ररथ असणार का याबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, आता 18 राज्यांच्या बैठकीत महाराष्ट्रालाही आमंत्रण देण्यात आलं आहे. याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असून मराठवाडा मुक्ती संग्रामाचेही हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्ली येथील राजपथावरील परडमध्ये समाविष्ट असावा, अशी विनंती मुनगंटीवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना केली होती. याला संरक्षण मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दिल्लीमधील चित्ररथाच्या पथसंचलनाच्या सोमवारी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत महाराष्ट्राला आमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे दिल्ली येथील परेडमध्ये आता २६ जानेवारीला महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे. साडेतीन शक्तीपीठांचा चित्ररथ यावेळी महाराष्ट्राला सादर करणार आहे. या शक्तीपिठांत महिला शक्तीचासुद्दा सहभाग आहे.