चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला;नारायण राणेंनी जाहीर केली तारीख
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी या विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते केलं जाणार आहे. त्या दिवसापासून विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.
"९ ऑक्टोबरला दुपारी १२.३० वाजचा चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. मी आणि ज्योतिरादित्य सिंधिया विमानाने मुंबईला येऊ आणि तिथून सिंधुदुर्गला जाणार आहोत. मी ज्योतिरादित्य सिंधिया यांना सकाळी भेटलो आणि त्यांच्याकडून विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे", असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलं.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वी चिपी विमानतळावरून विमानाचं उड्डाण ७ ऑक्टोबरपासून होणार आहे, अशी घोषणा केली होती. सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास अवघ्या अडीच हजारात सुरु होईल, अशी माहितीही त्यांनी दिली होती. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नव्या तारखेची घोषणा केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.