राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्स सदस्य सकारात्मक
राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत चाईल्ड टास्क फोर्समधील सदस्य सकारात्मक असून आज होणाऱ्या बैठकीत त्या संबंधी निर्णय होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.
"ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रकारे कोरोना रुग्ण संख्या राज्यात वाढत होती, ते पाहता अनेक पालक आपल्या मुलांना अशा स्थितीत शाळेत पाठवण्यास तयार नव्हते. तेव्हा सरकारला वाटलं की 10 ते 15 दिवस राज्यभरात शाळा बंद ठेवाव्यात आणि नंतर पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेऊ. मला वैयक्तिक असं वाटतं की शाळा लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरू कराव्यात. घरी बसून लहान मुलं कंटाळताय. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळ शाळा पुन्हा एकदा सुरू होईल का हे माहीत नाही. पण जिथे कोरोना रुग्ण कमी आहेत, जिथे वातावरण शाळा सुरू करण्यास योग्य आहे, जिथे पालक सुद्धा शाळेत पाठवायला तयार आहेत तिथे शाळा सुरू करायला काहीच हरकत नाही." असे चाईल्ड टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ. बकुळ पारेख म्हणाले.