गोपीचंद पडळकरांसह 41 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर 41 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून जिल्हाधिकाऱी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय
बैलगाडा शर्यतीला परवानगी द्यावी या मागणीला घेऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकर काही दिवसांपासून आक्रमक झाले होते. त्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात भव्य अशी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. काहीही झाले तरी शर्यत घेणारच असा निश्चय पडळकर यांनी केला होता. नंतर पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली. या प्रकारानंतर आता सांगलीतील प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आहे. पडळकर यांच्यावर जिल्हाधिकारी तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. पडळकर तसेच इतर 41 जणांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदा जमाव जमविणे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणे, कोरोनाकाळात आपत्ती व्यवस्थापनाचा नियम भंग करणे तसेच प्राणीजीवन कायद्या अंतर्गतसुद्धा सांगलीतील आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.