Chandrakant Khaire : 'औरंगाबादचा पाणी प्रश्न भाजपमुळेच रखडला'
मुंबई : औरंगाबादमध्ये पाणी प्रश्नावरुन आता राजकारण चांगलेच तापू लागले आहे. अशातच आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. औरंगाबादचा पाणी प्रश्न भाजपमुळेच रखडला असल्याची टीका खैरेंनी केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ८ जून रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनाची आज बैठक पार पडली. यावेळी चंद्रकांत खैरे बोलत होते. ते म्हणाले की, औरंगाबादचा पाणी प्रश्न भाजपमुळेच रखडला आहे. आताचा मोर्चा हा पाण्यासाठी नाही केवळ राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप खैरेंनी केला आहे. तर इतकी वर्षे हा प्रश्न मार्गी का लावला नाही हेही त्यांनी सांगावे, असेही आवाहन चंद्रकात खैरेंनी फडणवीसांना केले आहे.
भाजपकडून राज्य सरकारवर दररोज आरोप होत आहेत. मात्र, केंद्र सरकार काय करते हे सांगण्याकरता शिवसेनेकडून मराठवाड्यात विविध ठिकाणी पोलखोल सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. १ ते ४ जून दरम्यान विविध ठिकाणी पोलखोल सभा होणार आहेत. यामध्ये गेल्या ५ वर्षातील केंद्र सरकारच्या कामाची पोलखोल शिवसेनेकडून केली जाईल. व ८ जून रोजी उध्दव ठाकरे यांची भव्य सभा होईल, अशी माहिती चंद्रकांत खैरेंनी दिली.
दरम्यान, संभाजीराजे यांना राज्यसभेत उमेदवारीसाठी शिवबंधन बांधण्याचे आवाहन शिवसेनेने केले होते. परंतु, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला असून अपक्षच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर बोलताना चंद्रकांत खैरेंनी आमच्यासाठी पक्षाचा आदेश अंतिम असेल, असे सांगितले.