'त्या' वादग्रस्त विधानाप्रकरणी संभाजी भिडेंवर अखेर गुन्हा दाखल
अमरावती : महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचा निषेध करण्यात येत असून संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अशातच, आता अमरावतीमधून महत्वाची बातमी समोर येत आहे. वादग्रस्त विधानाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीत पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून आंदोलने करण्यात येत आहेत. याचे पडसाद अधिवेशनातही उमटले असून विरोधकांनी आक्रमक होत संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती. यानंतर अखेर अमरावती राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापेठ पोलीसांनी प्रक्षोभक भाषण करणे 153 कलम अंतर्गत संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर भिडेंवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले होते संभाजी भिडे?
मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले, असे संभाजी भिडे यांनी म्हंटले होते.