उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जखमी

उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला; तीन जखमी

Published on

मयुरेश जाधव | उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. या जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सततच्या घटनेने आता धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प १ मधील ए ब्लॉकमध्ये देवऋषी अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सदनिकेत सिलिंगच्या रिपेयरिंगचं काम सुरू होतं. यावेळी अचानक पहिल्या माळ्याचा स्लॅब कोसळून तळमजल्यावर आला. या घटनेत पहिल्या माळ्यावरील सदनिकेत असलेले तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही इमारत संपूर्णपणे रिकामी केली. आता महापालिकेच्या इंजिनियर्सकडून या इमारतीचा स्टॅबिलिटी रिपोर्ट घेऊनच इमारतीत रहिवाशांना राहू द्यायचं की नाही, याबाबचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेच्या उपायुक्त प्रियांका राजपूत यांनी दिली आहे.

दरम्यान, मागील दोन महिन्यात उल्हासनगर शहरातली इमारतीचा स्लॅब कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी २ इमारतींचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर उल्हासनगर शहरातील सर्व धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अतिधोकादायक इमारती पाडण्याची कारवाई उल्हासनगर महापालिकेकडून सुरू करण्यात आली होती. यावरून सध्या रहिवाशांचे पुनर्वसन, इमारतींचा पुनर्विकास यावरून शहरात मोठा गदारोळ सुरू असतानाच आता पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळण्याची तिसरी दुर्घटना घडल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

विषेश म्हणजे देवऋषी अपार्टमेंटचा समावेश धोकादायक इमारतींमध्ये नव्हता, तरीसुद्धा या इमारतीत स्लॅब कोसळल्याने सर्वच इमारतींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींवरील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com