Breaking : उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच
अमरावती : बहुचर्चित उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यानेच झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे,
अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची २१ जूनला रात्री हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवत आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून अद्यापही एक आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता नुपूर शर्मा प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्यानेच हत्या केल्याचा उघडकीस आले आहे.
सहा आरोपींपैकी दोन आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता दोन आरोपींपैकी डॉ. युनूस खान बहादूरखान याला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, आतिप रशीद याची तुरंगात रवानगी केली आहे. यापूर्वीच्या चार आरोपींना चार जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सदर गुन्ह्यास कलम१२०(ब) आणि १०९ भादवी कलमे वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, कोल्हे हत्या प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने ट्विटरद्वारे दिली आहे. या घटनेमागे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा हात आहे याचाही तपास करू, असेही सांगण्यात आले आहे.