‘बॉटल्स फॉर चेंज’ प्रदर्शन;  320 किलो प्लास्टिकपासून बनविल्या विविध वस्तू

‘बॉटल्स फॉर चेंज’ प्रदर्शन; 320 किलो प्लास्टिकपासून बनविल्या विविध वस्तू

Published by :
Published on

निसर्गाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी प्रत्येकजण काहींना काही प्रयत्न करत असतो. असाच एक प्रयत्न प्लास्टिकच्या पुनर्वापराच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने 'बॉटल फॉर चेंज' ही संकल्पना मांडून 'बिस्लेरी ट्रस्ट' स्वच्छ व हरित पर्यावरणासाठी सक्रियपणे कार्य करीत आहे. वापरलेल्या प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या मोहिमेंतर्गत एक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 'एमसीजीएम'च्या 'के पूर्व' वॉर्ड कार्यालयात उभारण्यात आलेल्या या प्रकारच्या या पहिल्या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 5 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले. पुनर्वापर केलेल्या 320 किलो प्लास्टिकपासून बनविलेल्या विविध वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

या उद्घाटन प्रसंगी 'एमसीजीएम'च्या 'झोन तीन'चे उपायुक्त पराग आर. मसुरकर, 'के पूर्व' वॉर्डचे सहआयुक्त प्रशांत सकपाळे, 'के पूर्व' वॉर्डच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला पाटील आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता निखिल कीर्तने हे या प्रदर्शनात उपस्थित होते. पंधरा उप-वॉर्ड आणि अंदाजे 28 किमी क्षेत्रफळ व्यापणाऱ्या 'के पूर्व' वॉर्डमध्ये अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि विलेपार्ले पूर्व हे भाग येतात. प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभानंतर अंजना घोष यांनी जनजागृती सत्र आयोजित केले.

बागेत ठेवण्याची बाके, शाळेतील बाके, फ्लॉवर पॉट, टी-शर्ट, पिशव्या, फ्लोअर टाईल्स आणि कचऱ्याच्या बादल्या अशा प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनविलेल्या विविध प्रकारच्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. पुनर्वापराद्वारे प्लास्टिकचा कसा हुशारीने उपयोग केला जाऊ शकतो आणि पर्यावरण रक्षणासाठी ही शाश्वत पद्धत कशी योग्य आहे, याबद्दल लोकांना शिक्षित करण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. 'द शक्ती प्लास्टिक इंडस्ट्रीज' या कंपनीने ही पुनर्वापरातील उत्पादने तयार केली आहेत.

प्लास्टिकला कचरा समजू नये, जबाबदारीने विल्हेवाट लावल्यास प्लास्टिकचा पुनर्वापर केला जाऊ शकतो, याविषयी 'बॉटल फॉर चेंज' या उपक्रमातून जनजागृती केली जाते. हे मॉडेल अंमलात आणण्यास सोपे आहे. प्लास्टिकची वस्तू वापरल्यानंतर ती स्वच्छ करणे, पिशवीमध्ये ती वेगळी ठेवणे आणि स्वच्छ प्लास्टिकच्या या पिशव्या आपल्या दारात येणाऱ्या कचरावेचकाकडे देणे एवढेच काम नागरिकांना करायचे आहे. हे कचरावेचक नंतर 'बॉटल फॉर चेंज व्हॅन'ला कॉल करतील आणि गोळा झालेल्या पिशव्या त्या व्हॅनच्या सुपूर्द करतील किंवा जवळच्या भंगार व्यावसायिकाला त्या पिशव्या विकून टाकतील. त्यातून या कचरावेचकांना पैसेही मिळतील. भंगार व्यावसायिकाने हे स्वच्छ प्लास्टिक रिसायकलरला विकायचे आहे. अशा प्रकारे ही साखळी पूर्ण होते. प्लास्टिकचे विविध प्रकार असतात. त्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते. त्यानंतर उपयुक्त उत्पादने बनवण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रिया करताना, 'एमएलपी (मल्टीलेअर प्लास्टिक) रॅपर्स'चे रुपांतर 'एमएलपी शीट्स'मध्ये करण्यात येते. त्या शीट्सपासून पुढे गार्डन बेंच, स्कूल बेंच, कुंपण, टाईल्स आणि इतर अनेक वस्तू बनविण्यात येतात. यातील 'एचडीपी' (हाय–डेफिनिशन प्लास्टिक) प्रकारच्या प्लास्टिकचे रुपांतर पेव्हर ब्लॉक्स व ग्रॅन्युल्समध्ये केले जाते व त्यातून फ्लॉवर पॉट्स, डस्टबिन अशी उत्पादने घेतली जातात. 'पेट बॉटल्स' ठेचून त्यातून 'फायबर फ्लेक्स' तयार केले जातात आणि त्यापासून टी-शर्ट्स, बॅग्ज व इतर अनेक वस्तू बनविल्या जातात. सुमारे 6,000हून अधिक गृहनिर्माण सोसायट्या, 850 कॉर्पोरेट कार्यालये, 70 शाळा आणि 12 महाविद्यालये असलेल्या परिसरात प्लास्टिक पुनर्वापराविषयीचे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रभावी उपक्रमाविषयी बोलताना, 'बॉटल्स फॉर चेंज' या 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' विभागाच्या संचालिका अंजना घोष म्हणाल्या, "संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करण्यावर आम्ही नेहमीच विश्वास ठेवला आहे. शाश्वतता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. प्लास्टिक हा एक बहुपयोगी पदार्थ आहे. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याने प्रचंड मूल्य निर्माण होण्यास मदत होते. या वर्तुळाकार अर्थव्यवस्था साखळीचा भाग असलेल्या प्रत्येक भागधारकासाठी मूल्य निर्माण करणे हे आमच्या 'बॉटल फॉर चेंज' उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. पुनर्वापरातून प्लास्टिकचा अनेक प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो, हे लोकांना दाखविण्याची संधी आम्हाला मिळाली. यामध्ये 'एमसीजीएम'च्या 'के पूर्व' वॉर्डचे सहकार्य मिळाले, हा आमचा सन्मानच आहे. महापालिकेच्या 'के पूर्व' वॉर्डच्या कार्यालयास दररोज सुमारे 2 हजार नागरिक भेट देत असतात. त्यांना हे प्रदर्शन पाहता येईल आणि पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकच्या विविध वापराचा प्रत्यक्ष अनुभवही मिळेल." प्लास्टिकपासून पर्यावरणाला धोका आहे असे मानले जाते; तथापि, प्लास्टिकचा वापर व्यवस्थित केला आणि त्याची जबाबदारीने विल्हेवाट लावली, तर ते शाश्वततेचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करू शकते. या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे प्लास्टिक वापरल्यानंतर ते स्वच्छ करणे, त्याची वर्गवारी करणे आणि ते पुनर्वापरासाठी पाठवणे. या छोट्या, पण महत्त्वाच्या पावलामध्ये प्रचंड क्षमता आहे. भारतात प्लास्टिकच्या कचर्‍याचे चांगले व्यवस्थापन होऊ शकले, तर देशातील 100 टक्के प्लास्टिकचे रीसायकल करण्याची संधी उपलब्ध होईल आणि आगामी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संवर्धनही होईल.

'बिस्लेरी ट्रस्ट'म्हणजे नेमके काय?

बिस्लेरी ट्रस्ट ही केवळ ग्राहकांची सुरक्षितता आणि निरोगीपणा विचारात घेत नाही, तर पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी जागरूकतेचे कार्यदेखील करते. सामाजिक उत्तरदायित्वाचा एक भाग म्हणून, या संस्थेने 'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रमाच्या माध्यमातून प्लास्टिकचा पुनर्वापर, 'नयी उम्मीद' प्रकल्पाच्या माध्यमातून 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' आणि 'ओझोन फोरम ऑफ इंडिया'च्या माध्यमातून 'ओझोन थेरपी' असे अनेक उपक्रम सुरू केले आहेत.

'बिस्लेरी'च्या 'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रमाविषयी माहिती:

नागरिकांमध्ये प्लास्टिकच्या पुनर्वापराचे महत्त्व आणि वापरानंतर प्लास्टिकचे स्रोत वेगळे करण्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सात शहरे, सहा लाख नागरिक, 800 गृहनिर्माण संस्था, 500हून अधिक कॉर्पोरेट कंपन्या, 400 शाळा व महाविद्यालये, 500 हॉटेल्स व रेस्टॉरंट्स यांच्यापर्यंत हा उपक्रम आतापर्यंत पोचला आहे. त्यांच्या माध्यमातून 6500 टनांपेक्षा जास्त स्वच्छ प्लास्टिक विविध उद्योगांकडे पुनर्वापरासाठी पाठविण्यात आले आहे. अधिक तपशीलासाठी, www.bottlesforchange.com या वेबसाईटला भेट द्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com