दाभोलकर, पानसरे तपास आणखी किती काळ?; न्यायालयाचा संतप्त सवाल

दाभोलकर, पानसरे तपास आणखी किती काळ?; न्यायालयाचा संतप्त सवाल

Published by :
Published on

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप तपास पूर्ण न झाल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला आहे. दाभोलकरांच्या हत्येला ८ तर पानसरेंच्या हत्येला ६ वर्ष होऊन गेली आहेत. मात्र, तरीही तपास पूर्ण न झाल्यानं न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत.

महाराष्ट्रानंतर कर्नाटकात घडलेल्या कलबुर्गी हत्या प्रकरणाचा खटला सुरूही झाला. आणखी किती काळ तुमचा तपास सुरू राहणार, किती काळ हे असंच सुरू राहणार, असे सवाल न्यायालयानं केले आहेत. दरम्यान, २ आठवड्यात याप्रकरणी उत्तर द्या, असे निर्देश सीबीआय आणि एसआयटीला देण्यात आले आहेत. तपास यंत्रणांकडून ठोस उत्तर न मिळाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या आधी होऊनही कलबुर्गी हत्येचा खटला कर्नाटकात कसा सुरू झाला? आम्ही तपास संस्थांच्या कामावर शंका घेत नाही. पण आणखी किती काळ हे असंच सुरू राहणार. हे थांबायला हवं आणि खटला सुरू व्हावा, असं मत न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठानं व्यक्त केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com