सांगलीत होड्यांच्या शर्यतीचा थरार अन् अचानक नदीत बोट उलटली; Video Viral
संजय देसाई | सांगली : कृष्णा नदीच्या पात्रामध्ये होड्यांच्या शर्यती (Boat Races) दरम्यान स्पर्धकाची बोट उलटल्याची घटना घडली आहे. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, कृष्णेच्या पात्रामध्ये पावसाळ्याच्या निमित्ताने होडयांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यावेळी हा प्रकार घडला आहे.
सांगलीच्या कृष्ण नदी पात्रामध्ये होडयांच्या शर्यती आयोजित करण्याची परंपरा आजही कायम आहे. पावसाळ्यात पाणी ओसरल्यानंतर होड्यांच्या शर्यतीला सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृष्णेच्या पात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. सध्या वाढलेली कृष्णा नदीची पाण्याची पातळी ओसरली आहे. त्यामुळे पात्रामध्ये आज होड्यांच्या शर्यतीला सुरुवात झाली.
यामध्ये पंचक्रोशीतील अनेक बोट क्लबने सहभाग घेतला होता. कृष्णाकाठावर होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला असतानाच अचानक एक बोट पलटी झाली. त्यानंतर स्पर्धकांनी पोहत नदीचा काठ गाठला. मात्र, यामध्ये होडी पाण्यात बुडाली.
होड्यांच्या शर्यतींचा थरार पाहण्यासाठी कृष्णाकाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. आणि बोट पलटीच्या घटनेमुळे सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडाला. मात्र, सर्व स्पर्धक पट्टीचे पोहणारे असल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. तर पार पडलेल्या होड्यांच्या शर्यतीमध्ये रॉयल कृष्णा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीच्या पात्रामध्येच मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळतो.