…तर महापालिकेतच भाजप पक्षप्रवेश कार्यक्रम राबवेल; आमदार गणेश नाईकांचा इशारा
सिद्धेश म्हाञे | नवी मुंबईच्या एका कोविड सेंटरमध्ये राजकीय पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमानंतर हा मुद्दाच चांगलाच पेटला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणावर आता आमदार गणेश नाईक यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. भाजपा महापालिका मुख्यालयात बॅनर लावून पक्ष प्रवेश कार्यक्रम राबवू असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला व्हेंटिलेटर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमानंतर काही महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यात आला. आश्चर्य म्हणजे मनपा आयुक्त अभिजित बांगर आणि खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. या पक्ष प्रवेशाचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. आमदार गणेश नाईक यांनी या प्रकरणावरून महापालिका आयुक्तांना चांगलेच धारेवर धरलंय. तुम्ही राज्याचे बाप नसून विश्वस्त आहात हे लक्षात असुद्या असा सज्जड दम त्यांनी भरला. तसेच तुम्हाला चालत असेल तर भाजपा महापालिका मुख्यालयात बॅनर लावून पक्ष प्रवेश कार्यक्रम घेईल असा इशाराच मनपा आयुक्तांना नाईक यांनी यावेळी दिला.