भाजप प्रदेशध्यक्षांनी गुजरात गाजवलं, पण जामनेरमध्ये मुलीचं पॅनल पराभूत
जळगाव : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी येत आहे.
जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. येथून गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील निवडणूक लढवत होत्या. त्यांच्याविरोधात प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलचे आव्हान होते. या निवडणुकीत भाविनी पाटील सदस्यपदी विजयी झाल्या. परंतु, त्यांचे ग्राम विकास पॅनल पराभूत झाले आहे. भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या. तर, शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला 10 पैकी 7 जागा मिळाल्या आहेत. त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळालं आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. परंतु, निकालात त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.