परमबीर सिंह यांच्या आरोपावरून भाजपा आक्रमक, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिले होते, असे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. हा आरोप अनिल देशमुख यांनी फेटाळला असला तरी, भाजपा या प्रकरणी आक्रमक झाली आहे. त्यांनी गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला आहे.
सचिन वाझे प्रकरण बाहेर आल्यानंतर पोलीस दलात वरिष्ठ पातळीवर बदल्या करण्यात आल्या. त्यात मुंबईचे पोलीस आयु्क्त परमबीर सिंह यांचाही समावेश होता. त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर त्यांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करतानाच अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सरकार वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनी सादर केलेला चॅट हा सर्वात मोठा पुरावा आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
परमबीर सिंह यांनी केलेले आरोप हे मुंबई पोलीस दलाची मान खाली घालायला लावणारे आहेत. हा प्रकार पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणारा आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
परमबीर सिंह यांना अटक करा
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी याप्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर कडाडून हल्ला केला आहे. हे खंडणी वसूल करणारे आणि गुन्हेगारांना संरक्षण देणारे सरकार असून हे सरकार बरखास्त करण्याची गरज आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया भातखळकर यांनी दिली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला तर पाहिजेच शिवाय, आयुक्त असताना याबाबत मौन बाळगणाऱ्या परमबीर सिंह यांनाही अटक करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.