भाजपत ब्राह्मणांचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होतेय
पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून हटवण्यासाठी नितीन गडकरी यांचे चारित्र्यहननाच्या माध्यमातून खच्चीकरण केले. यानंतर गेल्या तीन वर्षांपासून भाजपमधील तथाकथित नेतेमंडळी राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची घोडदौड रोखत आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे भाजपमध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण केले जात असल्याचे दिसून येत आहे, असा गंभीर आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी शुक्रवारी केला आहे.
कुलकर्णी म्हणाले, आज फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपला सत्तेच्या दारापर्यंत पोहोचवले. मात्र यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे निर्देश दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रिपदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरवल्यानंतर भाजपतील वरिष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरण करण्यात आले आहे
भाजपमध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चालले असल्याचे निदर्शनास येत आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितले की, मुख्यमंत्रिपद गुण पाहून द्यायचे की जात पाहून, हे ठरवले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचा भाजपने उपमुख्यमंत्रिपद देऊन अपमानच केला आहे. पुन्हा एकदा केवळ ब्राह्मण मुख्यमंत्री नको म्हणून जर त्यांना संधी नाकारली असेल तर भाजपसुद्धा जातीय राजकारणच करते हे सिद्ध झाले आहे.