केंद्र सरकार संघाच्या रिमोटवर… भूपेश बघेल यांचा नागपुरात आरोप
इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन हाती घेतले आहे. यासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
सध्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रिमोटवर चालते. यामुळे आता संघानेच महागाई कमी करण्यासाठी पुढाकार घेत हस्तक्षेप करावा व केंद्राला सूचना करावी. यासाठीच आपण नागपुरात येऊन ही मागणी करत आहोत. माझा आवाज संघाच्या कानापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे, असा टोला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लगावला आहे.
अ.भा. काँग्रेस समितीतर्फे महागाईविरोधात देशभरात जनजागरण केले जात आहे. याअंतर्गत भूपेश बघेल यांनी नागपुरात येत केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने गेली सात वर्षे हिंदू- मुस्लीम, मंदिर- मशीद, अशा भावनिक मुद्यांवर घालवले. जनहिताच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच महागाईने उच्चांक गाठला आहे, असे बघेल म्हणाले.