रिक्षात विसरलेली बॅग 12 तासांनी पोलिसांनी शोधली
भिवंडी शहरातील राम नगर ते गायत्री नगर येथे जाण्यासाठी रुबाब अन्सारी आपल्या पत्नीसह रिक्षात बसले. आपल्या कडील बॅग रिक्षाच्या पाठीमागील बाजूस ठेवून दिली व उतरल्या नंतर घेण्यास विसरून गेले. व रिक्षा ही दुसरे भाडे घेऊन निघून गेली. संबंधित बॅगेत रोख 15 हजार व 35 हजार रुपये किंमतीचे दागिने होते.
बॅग विसरल्याचे लक्षात येताच रुबाब अन्सारी यांनी शांतीनगर पोलीस चौकीत जाऊन कैफियत सांगितली.
त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार नामदेव निकम व मिलिंद निकम यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून त्या वेळी सदरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षांची माहिती काढून रिक्षाची ओळख पटवली व अवघ्या 12 तासात रिक्षाचा शोध घेतला असता त्या रिक्षाच्या पाठीमागील बाजूस बॅग ठेवली होती.
विशेष म्हणजे त्या रिक्षा चालकाला सुध्दा रिक्षात बॅग राहिल्याची कल्पना नव्हती त्यानंतर पोलिसांनी रुबाब अन्सारी यांना बोलावून सुरक्षित असलेली बॅग त्यांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परते बद्दल रुबाब अन्सारी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.