भिवंडीत पाणीपुरवठा चौकीत कोब्रा नाग, कामगारांची पळापळ
ग्रामीण भागात जंगल, शेती नष्ट करून मोठमोठी गृह संकुले उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात अचानक वातावरण बदल्याने बिळातून विषारी – बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना गेल्या काही दिवसापासून वाढल्या आहेत. त्यातच भिवंडी तालुक्यातील पोगाव मधून मुबंई महापालिकेला पाणीपुरवठा करणारी मोठी पाईपलाईन जात असून या पाइपलाईनची देखरेख करण्यासाठी बीएमसीने चौकी उभारली आहे. या चौकीतुन बीएमसीचे कामगार पाईपलाईनची देखभाल करीत असतात.
दुपारच्या सुमारास अचानक चौकीतील कामगार फिटर गणेश चौधरी यांना चौकीत घुसताना लांबलचक कोब्रा नाग दिसला. त्यांनी या विषारी नागाला हुसकविण्याचा प्रयत्न केला. मात्र कोब्रा नाग चौकीच्या मागे असलेल्या एका पत्र्याखाली जाऊन दळून बसला.
चौकीत नाग शिरल्याची माहिती सर्पमित्र हितेश करंजावकर यांना दिली असता हितेशने घटनास्थळी पोहचून शिताफीने या कोब्रा नागाला पकडून पिशवीत बंद केल्याने बीएमसीच्या कामगारांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा विषारी कोब्रा नाग साडेपाच फूट लांबीचा असून वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवागी घेवून त्याला जंगलात निर्सगाच्या सानिध्यात सोडण्यात आले.