Bhavana Gawali | सईद खानला ED न्यायालयाकडून जामीन
शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचे सहायक सईद खान यांना ED न्यायालयाकडून जामीन मिळालेला आहे. भावना गवळी या काही दिवसांपूर्वीच बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेल्या आहेत. सईद खान हा गवळी यांचा निकटवर्तीय समजला जातो. गवळी यांच्या अनेक आर्थिक व्यवहारांशी खान याचा थेट संबंध असल्याचं बोललं जातं.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर सर्वप्रथम घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर गवळी या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. याच आरोपांच्या अनुषंगानं ईडीनं मागील महिन्यात मोठी कारवाई करत गवळी यांच्या विविध संस्थांवर धाडी टाकल्या.
तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील रहिवासी असलेला सईद खान हा मोठा कंत्राटदार आहे. तो गवळी यांचे निकटवर्तीय मानला जातो. कंत्राटदार असल्यानं कामाच्या निमित्तानं सईद हा भावना गवळी यांच्या संपर्कात आला. खान याच्या माध्यमातून भावना गवळी यांनी आजवर अनेक मोठमोठी कामं केली असल्याचं बोललं जातं. ईडीनं तूर्त गवळी यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. मात्र, खान याच्या अटकेनंतर गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रकरणात सईद खान यांची चौकशी सुरु आहे. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर खान यांची सुटका करण्यात आली आहे. याचदरम्यान खान यांना आपला पासपोर्ट ED कडे जमा करावा लागणार आहे. तसेच त्यांना पुराव्यांशी छेडछाड करु नये अशी अट घालण्यात आली. दरम्यान भावना गवळी या काही दिवसांपूर्वीच बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेल्या आहेत.