सावधान ; गुरांसाठी प्राणघातक ठरतोय 'लुंपी' नावाचा आजार...
महाराष्ट्रात गेल्या महिनाभरात 'लुंपी' या आजाराने 22 गुरांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली येथेही त्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, अकोला, धुळे, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 133 गावांमध्ये हा आजार पसरला असल्याचं अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
हा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्यामुळे गुरांच्या त्वचेवर गुठळ्या होतात. ताप , दुधाचे कमी उत्पादन, त्वचेवर गुठळ्या येणे, नाक व डोळ्यांतून सतत पाणी येणे इ. या आजाराची लक्षणे आहेत. संक्रमित क्षेत्राच्या पाच किलोमीटरच्या परिघात 622 गावांमध्ये एकूण 2,21,090 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. 1,224 बाधित गुरांपैकी 752 उपचारानंतर बरी झाली आहेत. तर 22 जनावरांचा यामध्ये आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
पशुसंवर्धन विभागानुसार या आजारावर उपचार शक्य आहेत. संभाव्य उद्रेकाची तक्रार करण्यासाठी पशुवैद्यकांना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी किंवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक 18002330418 किंवा पशुवैद्यकीय सेवांसाठी राज्यस्तरीय टोल-फ्री क्रमांक 1962 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी अकोला जिल्ह्याचा दौरा करून बाधित जनावरांवर उपचार व लसीकरणाच्या कामांचा आढावा घेतला.