Balasaheb Thackeray Memorial | भूमिपूजन निमंत्रणावरुन राजकीय टीका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. दरम्यान यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
निमंत्रण पत्रिकेत एमएमआरडीए चे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नावचा सुध्दा उल्लेख नाही. आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, त्यांच्यानंतर… फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत…, अशी टीका भाजपाचे नेते नितेश राणे यांनी ट्वीटरवरून केली आहे.
आज संध्याकाळी 5.00 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत.