बदलापूर-मुरबाड रस्त्याची प्रचंड दुरवस्था
बदलापूरहून बारवी डॅममार्गे मुरबाडला जाणाऱ्या रस्त्याची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. एमआयडीसीच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून एमआयडीसी विभाग याकडे साफ दुर्लक्ष करतोय.
बदलापूर शहरातून मुरबाडला जाण्यासाठी बारवी डॅममार्गे एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर बाराही महिने प्रचंड वर्दळ असते. मात्र या रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे इथे गाडी चालवणं ही वाहनचालकांसाठी मोठी कसरत ठरतेय. या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी एमआयडीसीकडे असली, तरी एमआयडीसीनं गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. या रस्त्याच्या अवस्थेबाबत स्थानिक आमदार किसन कथोरे यांना विचारलं असता, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आपण अनेकदा एमआयडीसीच्या मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत पत्रव्यवहार केला, असून तरीही एमआयडीसी या रस्त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे एमआयडीसीला फक्त जागा खरेदी आणि विक्री इतकाच धंदा असल्याची टीका कथोरे यांनी केली. सरकारलाही याबाबत काहीही लाज वाटत नसल्याचं किसन कथोरे म्हणाले.