राम मंदिर गर्भगृहातील मूर्ती अद्याप ठरलेली नाही; अयोध्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची माहिती
अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर रामाच्या मूर्तीचे फोटो शेअर केले होते. त्यांनी ट्विट करत लिहिले की, प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत स्थापना केली जाणार आहे. असे सांगण्यात आले.
याच पार्श्वभूमीवर आता मात्र अशी माहिती मिळत आहे की, शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनविलेली रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार असल्याची माहिती पसरलेली होती मात्र अयोध्येतील राम मंदिरात कोणत्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार हे अद्याप ठरलेले नसल्याचं अयोध्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे.
यासोबतच गर्भगृहातील रामलल्लाची मूर्ती ही 5 वर्षे वयाच्या बालकाची असेल, असे ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले. श्रीरामलल्लांच्या कोणत्या मूर्तीची अयोध्या येथील भगवान श्रीरामाच्या मंदिराच्या गर्भगृहात प्रतिष्ठापना करावी, याचा अंतिम निर्णय अजून झाल्या नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केलं आहे.