औरंगाबादमध्ये ३० जेसीबी आणि ३३८ घरं जमीनदोस्त...
औरंगाबाद लेबर कॉलनी परिसरात (Aurangabad Labor Colony) सरकारने धडक कारवाई केली असून लेबर कॉलनीतली शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी घरं पाडायला सुरुवात झाली. गेल्या सहा महिन्यांपासून असलेला रहिवाशांचा विरोध लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलाय. औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी इथं २० एकर सरकारी जागेवर १९५३ मध्ये शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली होती.
वेगवेगळी प्रशासकीय कार्यालयं या एकाच ठिकाणी बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे.आज सकाळी ६ वाजताच पाडापाडीच्या कारवाईला सुरुवात झाली. त्यासाठी ५०० पोलिस, १५० अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आहे. घरे पाडण्यासाठी ३० जेसीबी आणि २०० मजुर काम करीत आहेत. घरे पडताना कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून या भागात बुधवारी जमावबंदी लागू करण्यात आला आहे.
१९५३ साली २० एकर भूखंडात प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी घरं बांधण्यात आली होती. याविरोधात स्थानिकांनी याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अखेर सरकारने जेसीबी चालवला आहे. ३३८ घरांवर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत जवळपास ३० जेसीबी पाठवले आहेत. ही जागा सरकारी आहे. अनेक ठिकाणी भाडेकरू ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी बांधलेली घरंही अनधिकृत असल्याने रहिवासी देखील अनधिकृतपणे राहत आहेत. प्रशासकीय इमारत जीर्ण झाली होती. निवृत्त झालेले अधिकारी देखील या ठिकाणी अद्याप वास्तव्यास आहेत. त्यामुळे ही जुनी झालेली घरे पाडून जिल्हा प्रशासन ही जागा आपल्या ताब्यात घेत आहे.