सातारा पोलिस दलात खळबळ; सहायक पोलिस उपनिरीक्षकाची 2 वर्षांसाठी पदावनती करून त्यांना पुन्हा हवालदार केलं
प्रशांत जगताप | सातारा: साताऱ्यातील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या केस प्रकरणात पैसे मागून त्रास दिल्या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के यांची 2 वर्षासाठी पदानवती करून त्यांना पुन्हा हवालदार करण्यात आले आहे.
राजेंद्र चोरगे यांनी याबाबतचे पुरावे पोलीस अधीक्षकांना सादर केल्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के यांच्यावर पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली आहे.. 12 लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 6 लाख घेतल्याचे पोलिसाने रेकॉर्डिंगमध्ये कबूल केलं आहे. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी तक्रारदार यांनी केलीये.
4 वर्षांपूर्वी गुरुकुल शाळेच्या मालकी हक्कावरून वाद झाला होता. यातून राजेंद्र चोरगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी आणि केस मध्ये मदत करण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के यांनी पैसे मागितले होते. या सर्व बाबी तक्रारदार राजेंद्र चोरगे यांनी रेकॉर्डिंग केल्या होत्या. हे सर्व पुरावे पोलीस अधीक्षकांकडे सादर करून गुन्हा दाखल करण्याची मागणी राजेंद्र चोरगे यांनी केली आहे. याप्रकरणी पोलीस खात्याअंतर्गत चौकशी झाल्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक शिर्के यांची पदावनती करण्यात आली आहे.