खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्सची नियुक्ती; एकनाथ शिंदेंची घोषणा
ठाणे | ठाणे शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता पालकमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नियुक्तीची घोषणा केली आहे. पावसाळ्यात खड्डे पडल्यास दोषींवर कारवाई करण्याचे अधिकार या टास्क फोर्सला असतील.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ठाणे पोलिस आयुक्त जय जीत सिंग, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नियुक्तीची घोषणा केली आहे.
या टास्क फोर्समध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते), अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी ठाणे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त यांच्यासह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एनएचएआय आदी यंत्रणांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. पावसाळ्याआधी रस्त्यांचा आढावा घेऊन रस्त्यांची डागडुजी दर्जेदार पद्धतीने होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याचे, तसेच पावसाळ्यात खड्डे पडल्यास दोषींवर कारवाई करण्याचे अधिकार या टास्क फोर्सला असतील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देतानाच दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत दुपारी १२ ते ४ वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले. त्याचप्रमाणे, जेएनपीटीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांचे नियमन करण्यासाठी नवी मुंबई, पालघर, पडघा याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग लॉट उभारण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.