Anil Deshmukh | अनिल देशमुख दिल्लीत तर CBI टीम मुंबईत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीचे आरोप लावले होते. मात्र या आरोपाच्या आधारे सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
हायकोर्टाच्या आदेशानुसार या आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले, त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला, अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्याजागी दिलीप वळसे पाटील यांना गृहखात्याचा कारभार सोपवला. सोमवारी राजीनाम्यानंतर अनिल देशमुखांनी दिल्ली गाठली, हायकोर्टाच्या आदेशाला अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे, त्यासाठी रात्री त्यांनी काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
अनिल देशमुख सध्या दिल्लीत असले तरी आज सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल होत आहेत, परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर जे आरोप लावले आहेत. त्याचा तपास करण्यासाठी सीबीआय मुंबईत येणार आहे. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे १५ दिवसांत १०० कोटी वसुलीच्या आरोपाची प्राथमिक चौकशी करण्यात येईल, आणि या चौकशीत जर काही तथ्य आढळलं असेल तर सीबीआयला FIR नोंद करण्याच्या सूचनाही हायकोर्टाने दिल्या आहेत.