मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे व्हिडिओ ट्विट करत म्हणाले...
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांनी सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा केल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड. दोन कुबड्यांच्या आधारावर म्हणजे JDU आणि TDP या दोन पक्षाच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करुन त्यांच्या मागण्या पूर्ण करुन खैरात ही बिहार आणि आंध्रप्रदेशला देण्याचा हा प्रयत्न आहे. बिहारला आणि आंध्रप्रदेशला निधी मिळतो याचे दु:ख वाटण्याचे काही कारण नाही. पण त्याचवेळी जो महाराष्ट्र देशात सर्वांधिक महसूल देणारं राष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र तोंडाला पानं फुसलेली आहेत.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, मग हा प्रश्न निर्माण होतो. जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे, जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिल्लीच्या वाऱ्या करत असतं. ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं काय करतंय? म्हणजे त्या ट्रिपल इंजिन सरकारचं या सरकारमध्ये काही भूमिका आहे हे आताच्या एनडीए सरकारला वाटतं नाही का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत भरघोस दान का पडलं नाही? याचं उत्तर खरं तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनी देणं गरजेचं आहे. एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा आजचा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावं लागेल. असं अमोल कोल्हे म्हणाले.