अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या भूमिकेत…शरद पवारांनी पाठराखण करत भाजपलांचं सुनावलं
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे वादंग निर्माण झाला आहे. या वादावर राजकारणातून विविध प्रतिक्रिया समोर येत असताना आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी यावेळेस अमोल कोल्हे यांची पाठराखण करत भाजपलांचं सुनावलं आहे.
शरद पवार म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. कलावंत म्हणून तो भूमिका घेतो. किंवा रामराज्यासंबंधी सिनेमा असेल तर त्यात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल तर तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही. एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे सीतेचं अपहरण केलं याचा अर्थ प्रत्यक्ष सीतेचं अपहरण त्या कलाकारने केलं असा होत नाही. रावणाचा इतिहास त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे अमोल कोल्हेंनी यासंबंधीची भूमिका घेतली असेल तर ती कलावंत म्हणून पहावं लागेल असं सांगत पवारांनी अमोल कोल्हेंचं समर्थन केले.
"अमोल कोल्हेंनी २०१७ मध्ये ही भूमिका केली तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते. हा सिनेमा अजून बाहेरही आलेला नाही. पण कलावंत म्हणून त्यांनी ती भूमिका केली असेल तर याचा अर्थ गांधींजींच्या विरोधात काहीतरी आहे असा नाही. नथुराम गोडसेने जे काम केलं आहे त्यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ, नाराज, दु:खी आहे. त्या नथुरामचं महत्व वाढवण्याचा यात कोणताही हेतू नाही. याकडे एक कलावंत म्हणून आणि या देशात घडलेला इतिहास समोर ठेवून पहायला पाहिजे," असं शरद पवारांनी सांगितलं.
भाजपाला टोला
"भाजपा नेते गांधीवादी कधीपासून झाले. भाजपा आणि आरएसएसच्या इतिहासावर मी भाष्य करु इच्छित नाही. पण एक काळ असा होता की गांधींच्या संबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या कुठे आहेत ते बघितलं पाहिजे, त्यानंतर त्यांनी बोलावं". आव्हाडांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी त्यांचं मत मांडलं असं शरद पवार म्हणाले. तसंच मी कोणत्याही कलावंताचा सन्मान करतो असंही म्हणाले.