अमोल कोल्हेंची कोल्हेकुई सुरू, नेमकं दु:ख कशाचं? आनंद दवे यांचा सवाल
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे एअरपोर्ट ऑथेरिटीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण करून दिली. यावेळी ते म्हणाले की, पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे. या त्यांच्या म्हणण्यावर त्यांना ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे की, कोल्हेंना नेमकं दु:ख कशाचं आहे? शिवाजी महाराजांची प्रतिमा नसण्याचं की पेशव्यांची असण्याचं? यासोबतच ते म्हणाले की, पुणे विमानतळावर पेशव्यांचा उल्लेख असण्याने कोल्हेकुई सुरु झाली आहे. केवळ विमानतळवरच नाही तर संपूर्ण पुणे शहरांत छत्रपतींच्या प्रतिमा, पुतळे असावेत ही आमची आधी पासूनचीच भूमिका आहे, असं आनंद दवे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.
प्रकरण नेमकं काय?
पुणे विमानतळावर काही पेंटिंग्ज काढण्यात आल्या आहेत. त्यात पेशव्यांच्या पेटिंग्ज आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराजांवरील एकही पेंटिग्ज नाही. त्यामुळे अमोल कोल्हे अत्यंत संतप्त झाले आहेत. त्यांनी ट्विटरवरून याबाबत पुणे विमानतळ प्राधिकरणाला जाब विचारला आहे. पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे याचा पुणे एअरपोर्ट अथॉरिटीला विसर पडला की काय?, असा सवाल कोल्हे यांनी केला आहे.